सिरोंचा तालूका जवळ असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध धार्मिक व तीर्थक्षेत्र असलेल्या काळेश्वरम येथे २१ मे ते १ जून २०२६ या कालावधीत १२ दिवसीय ‘सरस्वती अंत्य पुष्करालू (पुष्कर)’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश तसेच छत्तीसगड राज्यातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पुष्कर पर्वाला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असून, दर १२ वर्षांनी हा उत्सव साजरा केला जातो. या काळात सरस्वती नदीत पवित्र स्नान, पूजा-अर्चना, दानधर्म आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काळेश्वरम येथील श्री काळेश्वर मुक्तेश्वर स्वामी मंदिर परिसरात विशेष सजावट करण्यात येत असून, भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू आहे.भाविकांसाठी पिण्याचे पाणी, निवास, वैद्यकीय सेवा, वाहतूक व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात येत आहे. या धार्मिक महोत्सवामुळे काळेश्वरम परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.दरम्यान, सिरोंचा तालुक्यासह सीमावर्ती भागातील अनेक भाविकांनी काळेश्वरम येथे जाऊन पुष्कर स्नान करण्याची तयारी सुरू केली आहे.







