सागर मुलकला ✍️ संपादक
सिरोंचा : तेलंगणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र काळेश्वरम मंदिर येथे २१ मे ते १ जून दरम्यान सरस्वती अंत्य पुष्कर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक महोत्सवासाठी तेलंगणा राज्यासह महाराष्ट्र, छत्तीसगड व इतर राज्यांतून हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यंदाही पुष्कर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून यात्रेकरूंना ये-जा करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी Telangana State Road Transport Corporation अर्थात टीजी आरटीसीकडून विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.भूपालपल्ली टीजीआरटीसी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण यात्राकाळात तब्बल ३३६० विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे तेलंगणाला जोडून असलेल्या महाराष्ट्रातील सिरोंचा तालुक्यातूनही भाविकांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.सिरोंचा, असरअल्ली व परिसरातील यात्रेकरूंना काळेश्वरम येथे जाण्यासाठी सुमारे १०० बस उपलब्ध राहणार असल्याची माहिती भूपालपल्ली बस डेपो प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे सीमावर्ती भागातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.पुष्कर महोत्सवानिमित्त प्रशासनाकडून वाहतूक, सुरक्षा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. यात्रेदरम्यान लाखो भाविक काळेश्वरम येथे दर्शन व पवित्र स्नानासाठी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.







