सिरोंचा : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जंगल परिसरातील वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले असताना, मूलकला फाऊंडेशनने मानवतेचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. सिरोंचा – असरअल्ली गावाकडे जाणाऱ्या महामार्गावरील आईपेठा आणि वडदाम गावांच्या दरम्यान असलेल्या दाट जंगल परिसरात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे.या जंगल परिसरात हरिण, माकड तसेच विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. मात्र यंदाच्या प्रखर उन्हामुळे पाण्याअभावी अनेक वन्य प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मूलकला फाऊंडेशनचे प्रमुख सागर मूलकला आणि त्यांच्या सहकारी चिन्ना , राजू आकाश, कल्याण, उदय, स्वामीराज यांनी पुढाकार घेत जंगल परिसरातील विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवून त्यामध्ये नियमित पाणी भरण्याची व्यवस्था केली आहे.रस्त्यालगत ठेवण्यात आलेल्या या पाण्याच्या टाक्यांमुळे तहानलेल्या मुक्या जीवांना मोठा दिलासा मिळत असून, प्रवाशांकडूनही या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. “जंगलातील प्राणी आणि पक्षी हे निसर्गाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे,” असे मत मूलकला फाऊंडेशनच्या सदस्यांनी व्यक्त केले.तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरून थोडे पाणी आणून या टाक्यांमध्ये टाकावे, असे भावनिक आवाहनही फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.उन्हाच्या तडाख्यात तहानलेल्या वन्यजीवांसाठी पुढे सरसावलेल्या या उपक्रमामुळे परिसरात मानवतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला जात आहे.







