सागर मूलकला/ सिरोंचा
सिरोंचा ते अहेरी या मुख्य मार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात एका युवकाने अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. शिवमूर्तीसमोर हातात फलक घेऊन उभे राहत युवकाने “सिरोंचा ते अहेरी रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार?” असा सवाल उपस्थित केला.हातातील फलकावर स्थानिक आमदार, खासदार, मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांना उद्देशून रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनते. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.या अनोख्या आंदोलनाची चर्चा सध्या सिरोंचा तालुक्यात जोरात सुरू असून सोशल मीडियावरही नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.







