सागर मूलकला / संपादक
सिरोंचा : सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर मंजूर झाला असून, सभापतींना आपल्या पदाला मुकावे लागले आहे. बाजार समितीच्या राजकारणात या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली असून, पुढील सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सभापती यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत काही सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. बाजार समितीतील प्रशासन, निर्णय प्रक्रिया तसेच विविध कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे सभापतींवरील विश्वास उरला नसल्याचे सदस्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते.अविश्वास ठरावाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर नियमानुसार आज कृषी उत्पन्न बाजार समिती, सिरोंचा येथे विशेष बैठक पार पडली. या बैठकीत अविश्वास ठरावावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. मतदानादरम्यान अनेक सदस्यांनी सभापती यांच्या विरोधात मतदान केल्याने अखेर ठराव मंजूर झाला आणि सभापतींना पदावरून हटविण्यात आले.विशेष म्हणजे – ही सर्व घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते हलगेकर यांच्या नेतृत्वात अविश्वास प्रस्ताव सादर केल्याची राजकीय वर्तुळात, आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे,दरम्यान, बाजार समितीत आता नव्या राजकीय समीकरणांना वेग आला असून, काही दिवसांत नव्या सभापतीची निवड होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संपूर्ण घडामोडीमुळे बाजार समितीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, पुढील सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.






