सागर मूलकला/ सिरोंचा
सिरोंचा, दि. १ जून : धान खरेदी केंद्र सुरू करण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे अखेर संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. सिरोंचा तालुक्यातील अमराजी धान खरेदी केंद्र अंतर्गत येणाऱ्या नारायणपूर गावातील शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन छेडत शासन व प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.उन्हाळी हंगामातील धान कापणी होऊन महिनाभराहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही शासनाकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी हजारो क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरात व अंगणात पडून आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना धान भिजून खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. तरीही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.धान खरेदी सुरू करण्यासाठी अनेक वेळा निवेदने, मागण्या व पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने देण्यात आली, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांचा संयम अखेर संपला. शासनाच्या हमीभावापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात धान विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आर्थिक संकट अधिक गडद होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.आजच्या चक्का जाम आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले असून “धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा”, “शेतकऱ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.आता या आंदोलनाची दखल शासन व प्रशासन कितपत गांभीर्याने घेते आणि धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कोणता ठोस निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. मात्र, प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आंदोलनस्थळी तहसील कार्यालय अधिकाऱ्यांनी भेट दिली, आंदोलनकर्त्यांना दोन दिवसात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे,”धान शेतात पिकले, घरात आले; पण शासनाच्या दिरंगाईमुळे अजूनही विक्रीच्या प्रतीक्षेतच!”अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.






