मोयाबिनपेठा (ता. सिरोंचा) : सिरोंचा तालुक्यापासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोयाबिनपेठा येथील शेतकरी व समाजसेवक वेंकटस्वामी बंगारू जाकावार यांचे सुपुत्र अंजय जाकावार यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात जवान म्हणून निवड मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या अंजय यांनी लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले होते. आर्थिक व विविध अडचणींवर मात करत त्यांनी नियमित अभ्यासासोबतच शारीरिक तयारीवर विशेष भर दिला. त्यांच्या मेहनतीचे फळ अखेर मिळाले असून भारतीय सैन्यात जवान म्हणून त्यांची निवड झाली आहे.अंजय यांच्या या यशामुळे मोयाबिनपेठा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी अनेकांनी सांगितले की, शेतकरी कुटुंबातील युवकांनी अंजय यांचा आदर्श घेऊन शिक्षण, क्रीडा आणि देशसेवेच्या क्षेत्रात पुढे यावे. अंजय यांच्या यशामुळे परिसरातील युवकांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्यात दाखल झालेल्या अंजय जाकावार यांच्या या यशाने मोयाबिनपेठा गावासह संपूर्ण सिरोंचा तालुक्याचा गौरव वाढविला आहे.







