सिरोंचा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, सिरोंचा प्रकल्पांतर्गत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०२६ आहे.या भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष सागर मूलकला यांनी प्रशासनाकडे भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्याची मागणी केली आहे.मिडियाशी बोलताना सागर मूलकला म्हणाले की, अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना समान संधी मिळणे आवश्यक आहे. गुणवत्ता, शासनाच्या नियमावली व पात्रतेच्या निकषांनुसारच निवड प्रक्रिया पार पडली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप, पक्षपात किंवा अपारदर्शकता होऊ नये, याची प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी.ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक महिला या भरतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीची अपेक्षा ठेवून आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याचे आढळल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचा तीव्र विरोध करण्यात येईल आणि तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही सागर मूलकला यांनी दिला.दरम्यान, संबंधित जाहिरातीनुसार अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १२ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत असून, पुढील टप्प्यात पात्र उमेदवारांची प्राथमिक यादी, गुणवत्ता यादी व अंतिम निवड प्रक्रिया नियमानुसार पार पडणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







