प्रतिनिधी – सागर मूलकला. सिरोंचा
सिरोंचा : गेल्या काही महिन्यांपासून सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायतीतील कथित निधी गैरवापराच्या आरोपांवरून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. ग्रामपंचायतीच्या निधीचा दुरुपयोग करून पैसे खर्च केल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगत जाफराबाद ग्रामपंचायतीचे सरपंच स्वामी गोदारी यांनी यापूर्वी माध्यमांसमोर भूमिका मांडली होती. तसेच आनंदराव आशा यांनी विविध ठिकाणी तक्रारी करून आपल्यावर आरोप करत पैशांची मागणी व धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला होता.यानंतर आनंदराव आशा यांनीही माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना, आपण केलेल्या तक्रारींच्या मागे ग्रामपंचायत सदस्य महेंदर दुर्गम असल्याचा आरोप केला होता. या आरोप-प्रत्यारोपांमुळे जाफराबाद गावासह संपूर्ण सिरोंचा तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली.दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य महेंदर दुर्गम यांनी आज बामणी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची सत्यता चौकशीतून समोर आणण्याची मागणी केली आहे. आनंदराव आशा यांनी माध्यमांसमोर केलेले आरोप खोटे असून, आपल्याला या प्रकरणात गोवण्यासाठी आपल्या नावाचा वापर केला जात असल्याचे दुर्गम यांनी म्हटले आहे.या प्रकरणातील पैशांची मागणी, धमकी तसेच सोशल मीडियावरून बदनामी केल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी, यासाठीच आपण पोलिसांकडे तक्रार दाखल केली असल्याचे महेंदर दुर्गम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.आता पोलिस या तक्रारीची कोणत्या पद्धतीने चौकशी करतात आणि चौकशीतून नेमके काय समोर येते, याकडे जाफराबाद ग्रामपंचायतीसह संपूर्ण सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार असल्याने प्रशासन व पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे.







