तालुका अध्यक्ष सागर मूलकला यांचे पालकांना आश्वासन; घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
सिरोंचा, प्रतिनिधी
सिरोंचा | प्रतिनिधी ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे मोफत हृदय तपासणी शिबिरासाठी आणलेल्या ५ वर्षीय श्रावीण चेन्नूरी या मुलाचा इंजेक्शन दिल्यानंतर अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०३ जुलै २०२६ रोजी रंगयापल्ली येथील PSC मधील आशा सेविका, गटप्रवर्तक व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी भेट देऊन ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हृदय तपासणीचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यानुसार ते आपल्या मुलाला घेऊन दि. ०४ जुलै रोजी ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे पोहोचले.पालकांच्या म्हणण्यानुसार, मुलाला वॉर्ड क्रमांक २ मधील बेड क्रमांक १ वर ठेवण्यात आले. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या सिस्टरने मुलाला इंजेक्शन दिले. इंजेक्शननंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप पालकांनी केला आहे.मुलाला कोणते इंजेक्शन देण्यात आले, त्याची मात्रा किती होती, इंजेक्शन देण्यापूर्वी कोणत्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या आणि उपचारादरम्यान आवश्यक वैद्यकीय दक्षता घेण्यात आली होती का, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मृत मुलाचे वडील मोहन चेन्नूरी व आई गंगू चेन्नूरी यांनी केली आहे.पत्रकार संघटना न्यायासाठी पाठपुरावा करणारया प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार संघटना, सिरोंचा तालुका अध्यक्ष सागर मूलकला यांनी चेन्नूरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. घटनेची वस्तुनिष्ठ माहिती समोर आणण्यासाठी तसेच संबंधित प्रशासनाकडे चौकशीची मागणी करण्यासाठी पत्रकार संघटना आवश्यक तो पाठपुरावा करेल, असे सागर मूलकला यांनी पालकांना आश्वासन दिले.मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण अधिकृत वैद्यकीय चौकशी व अहवालातून स्पष्ट व्हावे, तसेच चौकशीत कोणाचीही निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास कायद्यानुसार कारवाई व्हावी, यासाठी पत्रकार संघटना पालकांच्या न्यायाच्या मागणीसोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, या घटनेबाबत संबंधित आरोग्य विभागाकडून अधिकृत चौकशी होऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणे आवश्यक आहे. निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.







