सागर मूलकला प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा : तालुक्यात नागपंचमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील विविध गावांमध्ये महिला व नागरिकांनी नागदेवतेची पूजा करून धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन केले.
नागपंचमीच्या दिवशी सकाळपासूनच महिलांची मंदिर परिसरात तसेच नागदेवतेच्या प्रतिमेजवळ पूजा-अर्चा करण्यासाठी लगबग दिसून आली.
त्यानंतर नागदेवतेला दूध, लाह्या, दुर्वा, फुले, हळद-कुंकू, नैवेद्य अर्पण करून विधिवत पूजा केली.
अनेक महिलांनी नागदेवतेला नमस्कार करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि पती-पुत्रांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. काही ठिकाणी महिलांनी एकत्र येत नागपंचमीची कथा, धार्मिक महत्त्व आणि प्राचीन परंपरांबाबत चर्चा केली.
घराघरांतही नागदेवतेची पूजा करून गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला.
नागपंचमी हा सण केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नसून निसर्ग, प्राणी आणि पर्यावरणाबद्दल आदर व्यक्त करणारा सण म्हणूनही पाहिला जातो. नागदेवतेच्या पूजेतून सर्पांविषयी असलेली श्रद्धा आणि निसर्गाशी असलेले नाते अधोरेखित आहे,
सिरोंचा तालुक्यातील महिलांनी उत्साहाने सहभागी होत पारंपरिक रितीरिवाजांचे पालन केल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
नव्या पिढीपर्यंत या परंपरा पोहोचविण्यासाठी महिलांकडून सण-उत्सवांच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन केले जात असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले आहे,







