महादेवपूरजवळ रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक; गुमलकोंडा गावावर शोककळा
सिरोंचा : तालुक्यातील गुमलकोंडा येथील विनीत व्यंकटी लाटकरी (वय २५) यांचा मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. महादेवपूर येथील पेट्रोल पंपाजवळ रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची धडक झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.विनीत लाटकरी हे मागील तीन वर्षांपासून हैदराबाद येथील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. कामानिमित्त हैदराबाद येथे वास्तव्यास असलेले विनीत हे सायंकाळी मोटारसायकलने आपल्या गावी गुमलकोंडा येथे येत होते. दरम्यान, महादेवपूर पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीची रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकसोबत धडक झाली.अपघाताची धडक इतकी भीषण होती की, विनीत यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अपघाताबाबत संबंधित पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती आहे.विनीत यांच्या आकस्मिक निधनाने गुमलकोंडा गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







