प्रतिनिधी सागर मूलकला
सिरोंचा, दि. ०८ जानेवारी २०२६ :गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस दल स्थापन दिनाचे औचित्य साधून सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गुरुवार दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचा उद्देश सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देणे हा असून, शिबिरात पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाली आहेत. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून अशा उपक्रमातून पोलिस दल समाजहितासाठी सदैव तत्पर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सिरोंचा उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमामुळे पोलिस दल व नागरिक यांच्यातील आपुलकी व विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी पोलिस निरीक्षक फटिंग यांनी व्यक्त केली आहे.







