अंकिसा येथील शेतकऱ्यांवर अन्याय; धान खरेदी केंद्राबाबत तहसीलदारांना निवेदन…
सिरोंचा/अशोक कुम्मरी
आदिवासी विकास कार्यकारी संस्था (आविका) अंकिसा यांच्या वतीने करण्यात येणारी धान खरेदी अंकिसा येथील खरेदी केंद्रावर न होता थेट आसरअल्ली येथील खरेदी केंद्रावर करण्यात येत असल्याने अंकिसा व परिसरातील शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष श्रीनाथ राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार सिरोंचा यांना निवेदन सादर केले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी आविका अंकिसा मार्फत धान खरेदी सुरू झाली. मात्र, गोडाऊनच्या अभावाचे कारण देत अंकिसा येथे धान खरेदी न करता आसरअल्ली येथील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना धान नेण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे प्रत्येक क्विंटलमागे सुमारे २०० रुपयांचा अतिरिक्त वाहतूक खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.या प्रकारामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून ही बाब गंभीर असल्याचे श्रीनाथ राऊत तसेच श्रीकांत शुगरवार यांनीही विनंती केली आहे,अंकिसा येथील धान खरेदी अंकिसा केंद्रावरच करण्यात यावी व तेथून आसरअल्ली येथील गोडाऊनमध्ये वाहतूक करण्यात यावी, किंवा शेतकऱ्यांना येणारा अतिरिक्त वाहतूक खर्च आविका संस्थेकडून देण्यात यावा, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तहसील प्रशासनाने या विषयात तातडीने हस्तक्षेप करून अंकिसा व परिसरातील शेतकऱ्यांवरील होणारी आर्थिक लूट थांबवावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.







