सागर मूलकला / सिरोंचा
सिरोंचा,
दि. ०८ जानेवारी २०२६ :
गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस दल स्थापन दिनाचे औचित्य साधून सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गुरुवार, दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रक्तदान शिबिरात पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून एकूण २५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.
रक्तदान हे मानवतेचे श्रेष्ठ कार्य असून या उपक्रमातून गरजू रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण रक्तसाठा उपलब्ध झाला आहे.
समाजहिताचे भान ठेवत पोलिस दल केवळ कायदा व सुव्यवस्थेपुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असल्याचे या शिबिरातून स्पष्ट झाले.
या यशस्वी उपक्रमासाठी सिरोंचा उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस निरीक्षक फॅटिंग आणि उप निरीक्षक नांदे, कुलकर्णी, जक्कन , वांगटी, सोनवणे, तसेच पोलिस अंमलदार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून पोलिस दलाचे कौतुक करण्यात येत असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.







