सिरोंचा तालुका दौऱ्यावर असताना गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सुहास गाडे यांनी असरअली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील उपलब्ध सुविधा, रुग्णसेवा तसेच व्यवस्थापनाची माहिती घेतली.असरअली येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुगरवार, अमजद शेख व विजय भिमकरी यांनी आरोग्य केंद्रातील विविध समस्यांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधले. रुग्णांसाठी नवीन बेड उपलब्ध करून देणे, बाथरूम दुरुस्ती करणे, तसेच आरोग्य केंद्रात नर्स व इतर रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी त्यांनी केली.सध्या असरअली आरोग्य केंद्रात महिलांसाठी डॉक्टर उपलब्ध असल्यामुळे उपचारासाठी महिला रुग्णांसह इतर रुग्णांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता आवश्यक वैद्यकीय साहित्य व औषधांचा पुरवठा वाढवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.या सर्व बाबींची दखल घेत मा. श्री. सुहास गाडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी श्री. कन्नाके (THO) व संवर्ग विकास अधिकारी श्री. कस्तुरे (BDO) यांना आरोग्य केंद्रातील समस्या तातडीने सोडवून आवश्यक उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे असरअली आरोग्य केंद्रातील सुविधा सुधारण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.







