सिरोंचा : आरडा ते जनमपल्ली गावाकडे जाणाऱ्या मार्गासाठी शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सध्या नवीन रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या काम इस्टिमेंट नुसार साहित्य वापरले जात नसल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.सदर मार्गावर गिट्टी व मुरूम टाकण्याचे काम सुरू असले तरी ते काम तांत्रिक निकषांनुसार व नियमित पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. कमी खर्चात काम उरकण्याचा प्रयत्न होत असून भविष्यात रस्ता लवकर खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. रस्त्याच्या कामाची तात्काळ तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा येत्या १० तारखेला जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सिरोंचा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.







