सिरोंचा : तालुक्यातील अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नाडीकुडा येथे झालेल्या आशा स्वयंसेविका पदाच्या भरती प्रक्रियेवर पुनर्विचार करून न्याय देण्याची मागणी अर्जदार श्रीमती शांती सडवली कावेरी यांनी प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली व जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली यांना निवेदन सादर केले असून ते तहसीलदार सिरोंचा यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नाडीकुडा येथील आशा स्वयंसेविका पदासाठी आरोग्य विभागाने नुकतीच भरती प्रक्रिया राबविली आहे. या पदासाठी गावातील अनेक महिलांनी अर्ज केले होते. त्यामध्ये श्रीमती शांती सडवली कावेरी यांनीही अर्ज केला होता.श्रीमती शांती कावेरी यानी यापूर्वी सिरकोंडा येथे आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत होत्या. कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी आरोग्य विभागासोबत प्रामाणिकपणे काम करत नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली होती. मात्र विवाहानंतर त्यांना सिरकोंडा येथील आशा स्वयंसेविका पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्या वेळी आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी नाडीकुडा येथे पद रिक्त झाल्यास अनुभवाच्या आधारे संधी देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा त्यांनी निवेदनात केला आहे. दरम्यान सध्या नाडीकुडा येथील आशा स्वयंसेविका पदाची भरती प्रक्रिया पूर्ण करताना त्यांना संधी न देता इतर महिला उमेदवारांची निवड करण्यात आल्याने ही बाब अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या अर्ज व पात्रतेचा पुनर्विचार करावा तसेच अनुभवाच्या आधारे नाडीकुडा येथे आशा स्वयंसेविका म्हणून संधी द्यावी, अशी मागणी श्रीमती शांती सडवली कावेरी यांनी प्रशासनाकडे केली आहे







