सिरोंचा : सिरोंचा ते असरअल्ली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ च्या डांबरीकरणासाठी एकूण ३३.५ कि.मी. कामास मंजुरी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात दोन वर्षांपूर्वी फक्त वडदमपर्यंत २२ कि.मी. रस्ता डांबरीकरण करण्यात आला असून उर्वरित ११.५ कि.मी. काम अपूर्णच ठेवण्यात आले आहे. संबंधित प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनी ही काम अर्धवट सोडून गायब झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.उर्वरित ११.५ कि.मी. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागत असून काहीजण गंभीर जखमी होत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. या परिस्थितीसाठी संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा संताप नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीकांत सुगरवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, सिरोंचा येथील अधिकाऱ्यांना निवेदन देत उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या अपघातांची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदार व यंत्रणेवर टाकण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.तसेच, संबंधित कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्यास त्याच्यावर कायद्यानुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.याशिवाय, सोमनपल्ली ते कोपेला मार्गावरील उर्वरित ३.५ कि.मी. डांबरीकरण व पुलांच्या अप्रोच कामेही गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. पावसाळ्यात हा मार्ग बंद होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे कामही तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.बॉक्स : मुख्य मागण्याउर्वरित ११.५ कि.मी. रस्त्याचे तातडीने डांबरीकरणखड्डे बुजविण्याचे काम त्वरित सुरू करणेकंत्राटदारावर कठोर कारवाई करणेसोमनपल्ली–कोपेला मार्गाचे काम पूर्ण करणेअशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सुगरवर यांनी केली आहे






