सिरोंचा : तालुक्यातील अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नाडीकुडा येथे झालेल्या आशा स्वयंसेविका पदाच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अर्जदार श्रीमती सडवली कावेरी यांनी भरतीवर पुनर्विचार करून न्याय देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली व जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली यांना निवेदन सादर केले असून ते तहसीलदार सिरोंचा यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नाडीकुडा येथील आशा स्वयंसेविका पदासाठी आरोग्य विभागाने नुकतीच भरती प्रक्रिया राबविली. या पदासाठी गावातील अनेक महिलांनी अर्ज केले होते. त्यामध्ये श्रीमती सडवली कावेरी यांनीही अर्ज सादर केला होता.श्रीमती कावेरी या यापूर्वी सिरकोंडा येथे आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत होत्या. कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी आरोग्य विभागासोबत कार्य करत नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र विवाहानंतर त्यांना सिरकोंडा येथील आशा स्वयंसेविका पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्या वेळी नाडीकुडा येथे पद रिक्त झाल्यास अनुभवाच्या आधारे संधी देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचा दावा त्यांनी निवेदनात केला आहे.मात्र सध्या नाडीकुडा येथे आशा स्वयंसेविका पदाची भरती प्रक्रिया पूर्ण करताना त्यांना संधी न देता इतर उमेदवारांची निवड करण्यात आल्याने अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी करून त्यांच्या अर्ज व अनुभवाचा विचार करीत न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करून पात्र उमेदवाराला न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.(बॉक्स)कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवाश्रीमती सडवली कावेरी या यापूर्वी सिरकोंडा येथे आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत होत्या. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागासोबत काम करत गावातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.







