गडचिरोली : माओवादग्रस्त व अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या भामरागड उपविभागातील बंगाडी या अतिदुर्गम भागात गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज (दि. 19 मार्च 2026) नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. छत्तीसगड सीमेलगत व लाहेरी उपपोस्टपासून अवघ्या 8 किमी अंतरावर असलेल्या या भागात उभारण्यात आलेले हे मदत केंद्र सुरक्षा व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, सिआरपीएफचे उप-महानिरीक्षक श्री. अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, तसेच सिआरपीएफ 192 बटालियनचे कमांडंट श्री. परविंदर सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
सदर पोलीस मदत केंद्राची उभारणी अवघ्या 24 तासांत पूर्ण करण्यात आली असून यासाठी सुमारे 1000 सी-60 कमांडो, 18 बीडीडीएस पथके, 500 विशेष पोलीस अधिकारी, नव्याने नियुक्त जवान तसेच खाजगी कंत्राटदार यांचा सहभाग होता. एकूण 1050 मनुष्यबळ, 4 जेसीबी, 2 पोकलेन, 8 ट्रेलर व 20 ट्रक यांच्या मदतीने ही उभारणी करण्यात आली.
या मदत केंद्रात 15 पोर्टा कॅबिन, वाय-फाय सुविधा, जनरेटर शेड, आरओ पाणी व्यवस्था, मोबाईल टॉवर, स्वच्छतागृह, मॅक वॉल, बीपी मोर्चा व सँड मोर्चा यांसारख्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. केंद्राच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाचे अधिकारी व जवान, एसआरपीएफ आणि सीआरपीएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.
या निमित्ताने आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक नागरिकांना साड्या, धोतर, ब्लॅंकेट, भांडी, मच्छरदाणी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच युवकांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.
सन 2023 पासून सुरू असलेल्या सुरक्षा बळकटीकरण उपक्रमांतर्गत हे 11वे पोलीस मदत केंद्र असून यापूर्वी फुलनार, तुमरकोठी व बिनागुंडा येथेही नवीन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, “या मदत केंद्रामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत सुरक्षा व विकास पोहोचेल. भविष्यात राष्ट्रीय महामार्ग, पूल, मोबाईल टॉवर व इतर विकासकामांना गती मिळेल तसेच एसटी बस सेवा सुरू होण्यासही मदत होईल.”
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून त्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.







