सिरोंचा : तालुक्यातील आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समोर आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली यांच्याकडे तक्रार दाखल करून भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी जुलै २०२५ मध्ये घेण्यात आलेली भरती प्रक्रिया अनियमितता आढळल्यामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे पाच महिन्यांनी नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान, भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवावी तसेच उच्चशिक्षित, विधवा व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही करण्यात आली होती.मात्र, १२ मार्च २०२६ रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान पुन्हा एकदा मनमानी कारभार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कन्नाके, आशा समन्वयक डॉ. सय्यद व इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पैशांची मागणी करत पात्र उमेदवारांना डावलून कमी गुणधारक उमेदवारांची निवड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या प्रकारामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून भरती प्रक्रिया त्वरित रद्द करावी तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, येत्या १० दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास ३० तारखेला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांनी करण्यात आले आहे.







