*सिरोंचा :* सिरोंचा–धर्मापुरी–कलेश्वर या महत्त्वाच्या महामार्गावर नुकतेच श्री साई कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आलेल्या रस्ते बांधकामातील त्रुटींमुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहेत. विशेषतः चिंतलपल्ली गावाजवळ, प्राणहिता हॉटेल समोर तसेच नगर पंचायत परिसरातील फुलावर बांधण्यात आलेले धोकादायक उंचवटे अपघातांना आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून या उंचवट्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. दरम्यान, नुकत्याच घडलेल्या गंभीर अपघातात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.स्थानिक नागरिकांनी संबंधित उंचवटे नियमबाह्य व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. तसेच या अपघातासाठी जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.याशिवाय, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना किमान 20 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी तसेच जखमींना तातडीने योग्य वैद्यकीय उपचार व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला असून, 15 दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.







