सिरोंचा :सिरोंचा–धर्मापुरी–कलेश्वर महामार्गावरील चिंतालपल्ली गावाजवळ, प्राणहिता हॉटेलसमोरील फुलावर तसेच नगर पंचायत परिसरातील फुलावर बांधण्यात आलेल्या उंचवाट्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या मुख्य रस्त्याचे बांधकाम श्री साई कन्स्ट्रक्शन कंपनीने केले असून, निकृष्ट दर्जाच्या उंचवाट्यांमुळे वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाला होता.दरम्यान, 29 मार्च रोजी प्राणहिता हॉटेलसमोर उंचवाट्यामुळे झालेल्या भीषण अपघातात नगरम येथील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन युवक गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती.या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार बातम्या प्रसिद्ध करत, संबंधित ठिकाणी असलेले उंचवाटे तात्काळ हटवून योग्य उपाययोजना राबविण्याची मागणी केली होती. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.या मागणीची दखल घेत संबंधित साई कन्स्ट्रक्शन कंपनीने तत्काळ कारवाई करत उंचवाटे हटविण्याचे आणि रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे.यामुळे भविष्यात या मार्गावर अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अखेर पत्रकार सागर मूलकला यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.






