सागर मूलकला / संपादक
सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या कारभाराविरोधात १४ नगरसेकांनी एकत्र येत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतल्याने नगरपंचायतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून नगरपंचायतीच्या कामकाजावरून नाराजी व्यक्त होत होती. विकासकामांमध्ये झालेला विलंब, निर्णय प्रक्रियेतील कथित एकतर्फीपणा आणि प्रशासनातील असंतोष यामुळे अखेर नगरसेकांनी हा कठोर निर्णय घेतल्याचे समजते.अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर आता पुढील प्रक्रिया कशी पार पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून यावर पुढील कार्यवाही होण्याची शक्यता असून, लवकरच विशेष बैठक बोलावली जाऊ शकते.दरम्यान, या घडामोडींमुळे नागरिकांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले असून, नगरपंचायतीत पारदर्शक व प्रभावी प्रशासनाची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर काही जणांनी राजकीय मतभेदांमुळे विकासकामांवर परिणाम होऊ नये, अशी चिंता व्यक्त केली आहे.आगामी काही दिवसांत या राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता असून, सिरोंचा नगरपंचायतीचे सत्तासमीकरण बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







