संपादक, सागर मूलकला
सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीतील अध्यक्ष व उपाध्यक्षांविरोधात १४ नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले असून, या संपूर्ण घडामोडीला “राजकीय बहुरूपी नाटक” असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाकडून करण्यात आला आहे. दि. २० एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहरात चर्चांना उधाण आले असताना, बहुजन समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या प्रस्तावामागील हेतूंवर सवाल उपस्थित केले आहेत. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, प्रस्ताव मांडणारे सर्व १४ नगरसेवक एकाच पक्षाचे असून आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. मागील चार वर्षांत विकासकामांपेक्षा भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांना चालना मिळाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. रस्ते, नाले व घरकुल बांधकामांमध्ये अनियमितता, शासकीय जमिनींचा गैरवापर तसेच साफसफाईच्या कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सन २०२३-२४ दरम्यान काही गरीब कुटुंबांची घरे जेसीबीने पाडण्यात आली, तर काही प्रकरणांत श्रीमंतांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांवर आतापर्यंत कोणत्याही नगरसेवकाने सार्वजनिकरीत्या भूमिका मांडली नसल्याचे सांगत, हे सर्व एकत्रित संगनमताचे लक्षण असल्याचा दावा करण्यात आला आहे. आगामी सहा महिन्यांत होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय नाटके सुरू असल्याचा आरोप करत, नागरिकांनी जागरूक राहून भ्रष्टाचार करणाऱ्या प्रतिनिधींना धडा शिकवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, या आरोपांमुळे सिरोंचा नगरपंचायतीच्या राजकारणात खळबळ उडाली असून, येत्या काळात या प्रकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.उपस्थित बहुजन समाज पार्टी तालुका सिरोंचा राजबापू डेब्बे, तालुका महासचिव, व्यंकटी दुर्गम, तालुका उपाध्यक्ष, सत्यम कुम्मरी, कोषाध्यक्ष अहेरी विधानसभा क्षेत्र, सडवली मेडीझेर्ल जेष्ठ कार्यकर्ता. प्रमोद सोदारी, कार्यकर्ता हे होते,







