सिरोंचा नगर पंचायत सिरोंचा येथील पाणीपुरवठा अभियंता धर्मेंद्र घोडे यांच्या तडकाफडकी बदलीच्या निर्णयामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत बदली तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे. तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सदर बदली ही एकतर्फी व घाईघाईत घेण्यात आलेला निर्णय असून त्यामुळे शहरातील आधीच विस्कळीत असलेली पाणीपुरवठा व्यवस्था आणखी बिघडण्याची शक्यता आहे. नागरिकांना दररोज पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असताना अनुभवी अधिकाऱ्याची अचानक बदली करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी न करता थेट बदलीचा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे बदली तात्काळ स्थगित करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, जर संबंधित अभियंत्याची बदली तत्काळ रद्द करण्यात यावी आणि त्या अभियंतांची चौकशी करण्यात यावी , अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घेणे आवश्यक ठरत आहे.
*प्रशासनाची भूमिका काय?*
या प्रकरणावर प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







