संपादक / सागर मूलकला
* सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली असून अध्यक्ष विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज निर्णायक मतदान पार पडले. २० एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी मा. अविशांत पांडा यांच्याकडे १४ नगरसेवकांनी एकत्र येत अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.या पार्श्वभूमीवर आज नगरपंचायत कार्यालयात उपविभागीय अधिकारी (SDM) राऊत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. यामध्ये १४ नगरसेवकांनी एकत्र येत आपली भूमिका ठामपणे मांडत मतदान प्रक्रिया पूर्ण केली. या घडामोडींमुळे नगर पंचायतीतील सत्तांतर आता निश्चित मानले जात आहे.बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना SDM राऊत यांनी सांगितले की, पुढील २५ दिवसांच्या आत अध्यक्ष पदाच्या पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यामुळे नगरपंचायतीत नवीन नेतृत्व येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या बैठकीस सिरोंचाचे तहसीलदार अजय सकुंदरवर यांच्यासह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रभारी नांदे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे सिरोंचा नगरपंचायतीत राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात नव्या राजकीय समीकरणांना वेग येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.







