संपादक / सागर मुलकला
सिरोंचा : प्रतिनिधीसिरोंचा तालुक्यात दि. 05 मे रोजी रात्रीच्या वेळेस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतातील उभे पीक जमीनदोस्त झाले असून भाजीपाला, धान तसेच इतर हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.आधीच वाढते खत, बियाणे आणि औषधांच्या दरामुळे शेतकरी अडचणीत असताना अवकाळी पावसाने त्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली होती, मात्र आता पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मीडियाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की, दरवर्षी अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होते, मात्र शासनाकडून मदत मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे यावेळी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.दरम्यान, तालुक्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






