सागर मुलकला / संपादक
* सिरोंचा : मोयाबीनपेठा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून गावकऱ्यांनी आणि शिवसेना शिंदे गटाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांमध्ये सन 2021 ते 2026 या कालावधीत करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप गावकरी संतोष चंदावर यांनी केला आहे.मोयाबीनपेठा बोड्रा , बोगटागूडेम, झेंडा, दर्शवडा या गावांतील विकास निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सचिव, सरपंच, उपसरपंच व सदस्यांविरोधात सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. अनेक वेळा लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी 12 मे 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान, या प्रकरणी मोयाबीनपेठा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती बेबीताई कोडापे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले.“माझा कोणताही दोष नाही. माझ्याकडे सर्व संबंधित पुरावे उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत जर काही भ्रष्टाचार झाला असेल, तर त्याची जबाबदारी उपसरपंचांची आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.सरपंचांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून ग्रामपंचायतीतील अंतर्गत मतभेदही उघड झाले आहेत. त्यामुळे आता प्रशासन या आरोप-प्रत्यारोपांची कितपत गंभीर दखल घेते आणि चौकशीची दिशा काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या संदर्भात तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे आणि विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांच्या मार्गदर्शनाखाली शासन व प्रशासनाला तातडीने चौकशी करण्याचा इशारा देण्यात आला. पत्रकार परिषदेला तालुका प्रमुख गणेश बोधनवार, युवा सेना प्रमुख प्रशांत नस्कुरी, संतोष चंदावार, प्रशांत चेंम्मकरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.आता या प्रकरणात सत्य काय आणि दोषी कोण, हे प्रशासनाच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.







