संपादक / सागर मुलकला ✍️
सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायतीतील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला असून, येत्या १२ मे रोजी नगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यमान नगराध्यक्ष व नगर उपाध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या कार्यालयात सादर करण्यात आल्यानंतर त्यावर विशेष बैठक घेऊन मतदान प्रक्रिया पार पडली.या मतदानात विद्यमान नगराध्यक्ष आणि नगर उपाध्यक्ष यांना बहुमताने पदावरून खाली करण्यात आल्याने सिरोंचा नगर पंचायतीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या घडामोडीनंतर आता नव्या नगराध्यक्ष निवडीसाठी १२ मे रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, कोणत्या पक्षाची किंवा गटाची सत्ता नगर पंचायतीवर स्थापन होणार याकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या नगर पंचायतीत विविध राजकीय गटांकडून जोरदार हालचाली सुरू असून, सदस्य फोडाफोडीपासून ते रणनीती आखण्यापर्यंत सर्व स्तरावर हालचाली वेगाने सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येक पक्षाकडून आपला उमेदवार विजयी करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असून, नगर पंचायतीतील वातावरण चांगलेच तापले आहे. १२ मे रोजी होणारी ही निवड प्रक्रिया सिरोंचा नगर पंचायतीच्या आगामी राजकीय दिशा ठरवणारी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. आता नगराध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.







