संपादक / सागर मुलकला ✍️
सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायतीतील नगराध्यक्ष पदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून, श्रीमती पद्मा सतीश बोगे या नगराध्यक्षपदी विराजमान होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नगर पंचायतीतील बदललेल्या सत्ता समीकरणांनंतर आता नव्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यमान नगराध्यक्ष आणि नगर उपाध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नगर पंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. त्यानंतर नव्या नगराध्यक्ष निवडीसाठी विविध गटांकडून हालचाली सुरू झाल्या. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींवरून श्रीमती पद्मा सतीश बोगे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.विश्वासू सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर पंचायतीतील बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या निवड प्रक्रियेत त्यांची नगराध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.दरम्यान, सिरोंचा शहरात या राजकीय घडामोडींची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, नगराध्यक्ष पदावर कोणाची अधिकृत निवड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवड प्रक्रिया ही नगर पंचायतीच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरणार असल्याची चर्चा शहरात रंगत आहे.







