संपादक / सागर मुलकला ✍️
सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली असून, सौ. पद्मा सतीश बोगे यांची नगरपंचायत अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान इतर इच्छुक सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा नगरपंचायतीत राजकीय हालचालींना वेग आला होता. विद्यमान नगराध्यक्ष व नगर उपाध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर नव्या अध्यक्ष निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. विविध गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच अखेर सौ. पद्मा सतीश बोगे यांच्या नावावर एकमत झाल्याचे चित्र समोर आले.मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या इतर सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सौ. बोगे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. आज सकाळी ११ वाजता नगरपंचायत सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर त्यांना नगरपंचायत अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषित करण्यात येणार आहे.दरम्यान, सौ. पद्मा सतीश बोगे यांच्या बिनविरोध निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सिरोंचा नगरपंचायतीच्या आगामी कारभाराकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.







