संपादक ✍️ सागर मुलकला
सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीच्या राजकारणात अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला असून, सौ. पद्मा सतीश बोगे यांची नगरपंचायत अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नगरपंचायत सभागृहात आज पार पडलेल्या अधिकृत प्रक्रियेनंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीची घोषणा करताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. गेल्या काही दिवसांपासून नगरपंचायतीत सत्तांतराच्या हालचालींना वेग आला होता. विद्यमान नगराध्यक्ष आणि नगर उपाध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली होती. त्यानंतर नव्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत असतानाच सौ. पद्मा सतीश बोगे यांच्या नावाला बहुमताचा पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले होते.अध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आलेले इतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सौ. बोगे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. आज झालेल्या अधिकृत प्रक्रियेनंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीमुळे सिरोंचा नगरपंचायतीत नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, सौ. बोगे यांच्या निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. शहरातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, आगामी काळात नगरपंचायतीच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते हलगेकरजी, सिरोंचा नगर पंचायतचे 14 नगर सेवक, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते मंडळी, बनय्या जनगम, मधुकर कोल्लूरी, सतीश बोगे,रवी सुलतान, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते,







