सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून विविध विकास योजनांतील निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप करत गावकरी संतोष चंदावार यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व काही सदस्यांनी संगनमत करून अनेक विकास कामे प्रत्यक्षात न करता शासनाचा निधी उचल केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात संबंधित विभागाकडे अनेक वेळा निवेदने व तक्रारी देऊनही कोणतीही चौकशी न झाल्याने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला.उपोषणाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनस्थळी अहेरी विधानसभा प्रमुख संदीप भाऊ कोरेत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कस्तुरे तसेच विस्तार अधिकारी शेख यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.यावेळी गटविकास अधिकारी कस्तुरे यांनी उपोषणकर्ते संतोष चंदावार यांना लेखी आश्वासन देत येत्या 20 तारखेपर्यंत चौकशी समिती नेमून ग्रामस्तरावर आमसभा घेण्यात येईल व मागण्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले.प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर संतोष चंदावार यांनी तात्पुरते आमरण उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. मात्र, दिलेल्या मुदतीत चौकशी व कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.दरम्यान, आंदोलनस्थळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोयाबीनपेठा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







