सागर मुलकला ✍️ संपादक
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तब्बल तीस वर्षांपासून सातत्याने ग्रामीण भागातील प्रश्न, आदिवासी क्षेत्रातील समस्या तसेच सामाजिक विषयांवर प्रभावी पत्रकारिता करणारे महेश तिवारी यांना महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA) तर्फे “सर्वोत्कृष्ट ग्रामीण पत्रकार” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.इलेक्ट्रॉनिक मीडियातील राज्यातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण पत्रकारितेत सातत्यपूर्ण आणि धाडसी कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.या विशेष कार्यक्रमाला भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे, राज्याचे वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.महेश तिवारी यांनी गेल्या तीन दशकांत गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि संवेदनशील जिल्ह्यात काम करताना ग्रामीण जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या पत्रकारितेचा गौरव वाढला असून पत्रकार क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







