प्रतिनिधी : श्याम बेज्जानवार
सिरोंचा : जागतिक डेंग्यू दिनानिमित्त सिरोंचा तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने व्यापक जनजागृती व डास नियंत्रण मोहीम राबविण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजिता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे पार पडला.तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर कन्नाके यांच्या नेतृत्वाखाली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सिरोंचा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक एम. एस. बोल्ले, आरोग्य पर्यवेक्षक तथा आरोग्य सहाय्यक आर. जे. अजमेरा, आरोग्य सेवक आकाश, येतम सर, आरोग्य सहाय्यिका श्रीमती बायास्कर, समुदाय आरोग्य अधिकारी कु. बट्टीवार, तसेच श्री. शेख, श्री. बुरम आणि ग्रामीण रुग्णालयातील इतर आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान डॉ. मनोहर कन्नाके यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मोहिमेत अधिक गती आणण्याचे निर्देश दिले. नियमित गृहभेटीदरम्यान कंटेनर सर्वेक्षण प्रभावीपणे राबवावे, गावागावांत मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती वाढवावी आणि नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे, असे त्यांनी सांगितले.आरोग्य विभागाकडून नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. दर आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळून घरातील पाण्याच्या टाक्या, कुलर, फुलदाण्या, जुने टायर, नारळाच्या करवंट्या व रिकामे डबे पूर्णपणे स्वच्छ करून वाळवावेत. घराभोवती पाणी साचू देऊ नये, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, मच्छरदाणीचा वापर करावा तसेच डास प्रतिबंधक क्रीम, कॉईल किंवा लिक्विडचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.कुलरमधील पाणी नियमित बदलणे तसेच फ्रिजच्या मागील वेस्ट वॉटर ट्रेची स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. डेंग्यूचा प्रसार करणारे ‘एडिस’ डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतात, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दक्ष राहणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, सांधेदुखी आणि अंगावर पुरळ उठणे ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे असल्याचे सांगत, अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घ्यावेत, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सिरोंचा यांच्या वतीने करण्यात आले आहे.







