सिरोंचा तालुक्यातील कोरला येथील लक्ष्मी मलय्या तोगर या दिनांक १४ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास तेंदू पान तोडण्यासाठी जंगल परिसरात गेल्या असता त्यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना घडली.
आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत आगीने मोठा भडका घेतला होता.
या आगीत घरातील दैनंदिन वापराचे साहित्य, कपडे, धान्य तसेच ठेवलेली रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक झाली.
त्यामुळे संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कुटुंबावर संकट ओढवले आहे.
घटनेची माहिती गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना दिल्यानंतर पातागुडम पोलीस ठाण्याकडून प्रभारी अधिकारी धोत्रे, पोलीस उप निरीक्षक कोटावळे, महिला पोलीस उप निरीक्षक बास्टेवाड म्याडम तसेच पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नुकसानग्रस्त घराची पाहणी करून कुटुंबीयांची विचारपूस केली. तसेच तातडीची गरज ओळखून घरातील वापरासाठी आवश्यक साहित्य व रोख रक्कम देऊन आर्थिक मदत केली.
पोलिसांनी केलेल्या या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून परिसरातील नागरिकांकडून पोलिसांच्या संवेदनशीलतेचे व तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच गावकऱ्यांनीही पीडित कुटुंबाला मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.