संपादक / सागर मुलकला
सिरोंचा : आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिरोंचा पोलिस प्रशासनाने उप विभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रभारी अधिकारी नांदे आणि पोलीस अंमलदारांनी तसेच आपदा मित्रा किरण वेमूला यांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. मुसळधार पाऊस, नदी-नाल्यांना पूर, झाडे पडणे तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस विभाग सतर्क झाला आहे.सिरोंचा पोलिस ठाण्याच्या वतीने आपत्कालीन बचाव साहित्य, वायरलेस यंत्रणा, बोट व्यवस्था तसेच आवश्यक सुरक्षा साधनांची तपासणी करण्यात येत आहे. पूरप्रवण भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी पावसाळ्यात अनावश्यक धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.तसेच स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्यासोबत समन्वय साधून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचविण्याची तयारी करण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.मान्सून काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सिरोंचा पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.







