सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व सीमावर्ती भाग असलेल्या सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला “उपजिल्हा रुग्णालय (SDH)” दर्जा देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) ओबीसी विभागाचे शहर प्रमुख रविकांत सत्यनारायण बुरावार यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन तहसीलदार कार्यालयामार्फत सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा तालुका हा तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर असून भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम भाग आहे. तालुक्यातील १०५ हून अधिक गावांतील नागरिकांची आरोग्य व्यवस्था सिरोंचा ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे. मात्र, येथे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, अपुरी सुविधा आणि मर्यादित खाट क्षमता यामुळे गंभीर रुग्णांना तेलंगणातील मंचेरियल किंवा कालेश्वरम येथे उपचारासाठी जावे लागते.सध्या ग्रामीण रुग्णालयात केवळ ३० खाटांची सुविधा असून ती लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यास ५० ते १०० खाटांची सुविधा उपलब्ध होऊन आवश्यक निधी व वैद्यकीय सेवा वाढतील, असा दावा करण्यात आला आहे.तसेच, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि शल्यचिकित्सक यांची पदे मंजूर नसल्याने २४ तास आपत्कालीन सेवा देण्यात अडचणी येत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. रुग्णालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा व रक्तपेढी नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले.भौगोलिक परिस्थिती व स्थानिक नागरिकांची गरज लक्षात घेऊन सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाला तातडीने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, तसेच आवश्यक पदे भरून आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.







