सागर मुलकला ✍️सिरोंचा
सिरोंचा : ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी ओळखून मदतीचा हात पुढे करणाऱ्या पातागुडम पोलिसांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. मौजा रायगुडम येथे गावातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी पोलीस स्टेशन पातागुडमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून नवीन पाण्याची मोटार उपलब्ध करून दिली.गावातील विहिरीवर बसविण्यात आलेली जुनी मोटार अचानक बंद पडल्याने ग्रामस्थांवर पाण्याचे संकट निर्माण झाले होते. उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती मिळताच पातागुडम पोलिसांनी तत्काळ पुढाकार घेतला. कोणतीही शासकीय मदत न घेता अधिकारी व अंमलदारांनी स्वतःच्या खर्चातून नवीन मोटार उपलब्ध करून देत ग्रामस्थांची समस्या दूर केली.या उपक्रमामुळे रायगुडम गावातील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला असून ग्रामस्थांनी पोलीस विभागाचे मनापासून आभार मानले. “पोलीस हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे मित्र आहेत,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.या वेळी पोलीस स्टेशन पातागुडमचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर धोत्रे, PSI मंगेश कोठावळे, PSI स्वाती बाष्टेवाड तसेच पोलिस अंमलदार मनोज नैताम, सुधीर पोकला, शुभम वैद्य व इतर कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक उत्तरदायित्व जपत नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







