✍️ सागर मुलकला / संपादक
सिरोंचा तालुक्यातील मुदूकृष्णापूर गावातील पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक अवस्थेत असून ती कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून टाकीच्या आधारासाठी वापरण्यात आलेले लाकूड पूर्णपणे कुजले असून संपूर्ण रचना जीर्ण अवस्थेत गेली आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्राम पंचायत प्रशासनाला लेखी निवेदने देऊनही अद्याप कोणतीही दुरुस्तीची कामे करण्यात आलेली नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.गावातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मुख्यतः या टाकीवरच अवलंबून राहावे लागत आहे. येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने टाकी कोसळल्यास गावात मोठी पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे सदर पाण्याची टाकी सार्वजनिक ठिकाणी असल्याने परिसरात सतत नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे टाकी अचानक कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य दुर्घटनेस ग्राम पंचायत पेंटिपाका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.ग्रामस्थांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी केली आहे.







