संपादक/ सागर मूलकला
सिरोंचा : टेकडाताल्ला – कांबलपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावरील रखडलेल्या पुलाच्या बांधकामाच्या निषेधार्थ टेकडा परिसरातील तब्बल ३० गावांतील नागरिकांनी आज सिरोंचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली. गेल्या दीड वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या या पुलाच्या कामामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून शासन आणि संबंधित विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, टेकडाताल्ला – कांबलपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावरील पुलाचे बांधकाम शासनाकडून मंजूर होऊन दोन ते तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र संबंधित विभाग आणि ठेकेदारांनी हे काम अर्धवट अवस्थेत सोडून दिल्याने संपूर्ण टेकडा भागातील नागरिकांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.हा पूल टेकडा भागातील नागरिकांसाठी मुख्यालयाशी संपर्क साधणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. शैक्षणिक, वैद्यकीय, शासकीय तसेच दैनंदिन कामांसाठी हजारो नागरिकांना या मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र पुलाचे काम रखडल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, या पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी अनेक वेळा संबंधित विभागाला तसेच तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदने देण्यात आली होती. मात्र शासन आणि प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.दरम्यान, काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने अट्टीवागू नाल्यावर पाणी वाढून हा मार्ग पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टेकडा भागातील अनेक गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.याच पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी ३० गावांतील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.“जोपर्यंत पुलाचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.







