मेडारम, नारायणपूर, अमरावती, करसपाली व रंगायपली येथील शेतकऱ्यांची मागणी; प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा…!
सिरोंचा तालुक्यातील मेदारम, नारायणपूर, अमरावती, करसपाली व रंगायपली या गावांमध्ये तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, परिसरातील शेतकऱ्यांचे धान मोठ्या प्रमाणात तयार असून अद्याप शासनामार्फत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या हमीभावाचा लाभ मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात धान विकावे लागत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.
धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर माजी उपसरपंच केशव नस्कुरी, वेंकणा भीमकरी, उपसरपंच अशोक हरी यांच्यासह परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.







