सागर मूलकला/ सिरोंचा
सिरोंचा, दि. २ : सिरोंचा येथील एसटी बसस्थानक परिसरात प्रवाशांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने माजी मंत्री तथा आमदार मा. धर्मराव बाबा आत्राम यांच्या देणगीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर यंत्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या यंत्राचे उद्घाटन नगराध्यक्षा पद्माताई भोगे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. एसटी बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करत असल्याने त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अ.प. गट) चे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, नगरसेवक जगदीश रल्लाबंडीवार, नगरसेवक सतीश भाऊ बोगे, शहराध्यक्ष रवी सुलतान, तालुका कार्यकारी अध्यक्ष मदनय्या मादेशी, सेवादल तालुका अध्यक्ष ओमप्रकाश ताटीकोंडावर, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष जुगनू भाई, वेंकटेश पुजारी, युवा नेते कौशिक बोगे, रमेश मानेम, साईकिरण बोगे तसेच नवीन सांगेम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मा. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत सार्वजनिक हितासाठी राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. बसस्थानकात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने एसटी प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, या सुविधेचा लाभ हजारो नागरिकांना होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.सार्वजनिक सेवेसाठी करण्यात आलेले हे योगदान नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारे असून, लोकहिताच्या अशा उपक्रमांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.






