सिरोंचा, दि. ३ जून : बामणी धान खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या धानाची तात्काळ खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी बामणी केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांतील सुमारे ३०० शेतकऱ्यांनी तहसीलदार सिरोंचा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बामणी धान खरेदी केंद्राअंतर्गत अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात धान विक्रीसाठी तयार असून मागील वर्षी शासनामार्फत सोसायटीच्या माध्यमातून धान खरेदी करण्यात आली होती. यावर्षीही शेतकऱ्यांनी धानाची साठवणूक करून खरेदी प्रक्रियेची प्रतीक्षा केली आहे. मात्र अद्यापपर्यंत धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या पावसाळ्याची सुरुवात झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान उघड्यावर साठवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस किंवा इतर प्रतिकूल हवामानामुळे धानाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वेळेत धान विक्री न झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.शासनाच्या हमीभावाचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर मिळावा व त्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी सोसायटीमार्फत धान खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.दरम्यान, पुढील चार दिवसांत धान खरेदी प्रक्रिया सुरू न झाल्यास परिसरातील सर्व शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास तसेच शेतकऱ्यांच्या संभाव्य नुकसानीस प्रशासन व शासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सदर निवेदनाची प्रत उपविभागीय पोलिस अधिकारी सिरोंचा, पोलिस निरीक्षक सिरोंचा तसेच पोलिस निरीक्षक बामणी यांना माहितीस्तव देण्यात आली आहे. बामणी केंद्राअंतर्गत गावांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने हे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.







