सिरोंचा, प्रतिनिधी : आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच पाणीजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक मान्सूनपूर्व कामे तातडीने हाती घेण्याची मागणी नगरसेविका नुसरत बाबर शेख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सिरोंचा नगर पंचायतच्या अध्यक्षा पद्मा भोगे यांना निवेदन सादर केले.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात शहरातील नाल्यांची स्वच्छता, पाणीपुरवठा पाइपलाइनची साफसफाई, रस्त्यांची स्वच्छता, विहिरींची स्वच्छता तसेच इतर आवश्यक मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाल्यास नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होईल आणि पाणीजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे नगरसेविका नुसरत शेख यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षा पद्मा भोगे यांनी निवेदनाची दखल घेत शहरातील सर्व आवश्यक मान्सूनपूर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेवक सतीश भोगे, रणजीत गागापूरवार, भगवान पिल्लीवार (काका) तसेच इज़हार शेख उपस्थित होते.







