सागर मूलकला/ सिरोंचा
सिरोंचा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलीस स्टेशन सिरोंचा येथे पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता मोहिमेने करण्यात आली. या मोहिमेत पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच एस.आर.पी.एफ.चे अधिकारी व जवान यांनी सक्रिय सहभाग घेत श्रमदानाद्वारे परिसर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त केला. “स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेचा संदेश यावेळी देण्यात आला.त्यानंतर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. एकूण २८ रोपांची लागवड करण्यात आली असून त्यामध्ये ८ आंबा, ७ पेरू, ५ नारळ आणि ८ सीताफळाच्या रोपांचा समावेश आहे. लावण्यात आलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारली.वृक्षारोपण कार्यक्रमानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री. सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत वाढते तापमान, हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व अधिकारी व अंमलदारांना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची शपथ देण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







