प्रतिनिधी पब्लिक समाचार न्यूज सिरोंचा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर मूलकला यांनी सिरोंचा तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वाढत्या उष्णतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराभोवती किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याची तीव्रता सातत्याने वाढत असून त्याचा फटका सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होत असून पक्षी व वन्यप्राण्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी उष्माघातामुळे जीवितहानीच्या घटनाही घडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे वृक्षारोपणाला लोकचळवळीचे स्वरूप देत प्रत्येक गाव, वाडी आणि कुटुंबाने पुढाकार घ्यावा. लावलेले झाड जगविण्यावर भर देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सागर मूलकला यांनी सांगितले. “एक व्यक्ती – एक झाड” हा संकल्प स्वीकारून हिरवेगार आणि पर्यावरणपूरक सिरोंचा घडविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले आहे.







