सिरोंचा, सागर मूलकला, प्रतिनिधी : तालुक्यात सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला असून, तब्बल 24 तास उलटूनही वीजपुरवठा पूर्ववत करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. परिणामी सिरोंचा तालुक्यातील 100 हून अधिक गावे अंधारात बुडाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू होताच सिरोंचा तालुक्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. तालुक्यासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र (केव्ही) नसल्यामुळे प्रत्येक वर्षी नागरिकांना या समस्येचा फटका बसत आहे. मात्र या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात शासन आणि प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा तसेच विविध व्यावसायिक व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाकडून अद्याप ठोस माहिती किंवा कालमर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना दरवर्षी सिरोंचा तालुक्यातील 100 पेक्षा अधिक गावे अंधारात राहणे ही गंभीर बाब मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी टेकडा ताला परिसरातील 30 गावांच्या नाल्याच्या समस्येबाबत मुख्यमंत्री स्वतः आंदोलकांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजनांचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्या गावांतील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले.
मात्र दरवर्षी उद्भवणारी आणि हजारो नागरिकांना वेठीस धरणारी सिरोंचा तालुक्यातील वीज समस्या मुख्यमंत्री आणि शासनापर्यंत का पोहोचत नाही? या प्रश्नाकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, शासन व प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासह कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी सिरोंचा तालुक्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.







